औरंगाबाद : महानगरपालिकेच्या निवडणुकीत 115 वॉर्डातून उमेदवार उभे केले जातील अशा वल्गना सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी करीत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र हिंदूबहूल वॉर्डात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडीला तर दलित -मुस्लिम पट्ट्यात शिवसेना, भाजपाला उमेदवार मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
महानगरपालिकेची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. मनपाची सत्ता एक हाती आपल्या पक्षाच्या ताब्यात यावी यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी व अन्य पक्ष प्रयत्न करीत आहेत. शहरातील सर्व 115 वॉर्डातून निवडणूक रिंगणात उमेदवार दिले जातील असे छातीठोकपणे सर्वच राजकीय पक्षाचे नेते करीत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र तसे चित्र नाही. शहराची रचना लक्षात घेता. लोक जाती, धर्मानुसार वास्तव्यास आहे. जुन्या शहरातील बेगमपुर्यापासून ते आझाद चौकापर्यंतच्या पट्ट्यात सर्वाधिक मुस्लिम समाजाचे नागरिक राहतात. या पट्ट्यात जवळपास 25 ते 30 वॉर्ड येतात. तसेच दलित वसाहती या शहराभोवती चोहोबाजूंनी आहे. पण मोठ्या प्रमाणात एकत्रीत वसाहती असल्याने 25 ते 30 वॉर्डात दलित मतदारांचे प्राबल्य आहे, अशा या दलित -मुस्लि वसाहतीमध्ये शिवसेना आणि भाजपसारख्या संघटनांचे कार्यकर्तेच नसल्याने निवडणुकीकरिता उमेदवार मिळणे अवघड झाले आहे. तर सिडको-हडको, ज्योतीनगरपासून ते चिकलठाण्यापर्यंतच्या पट्ट्यात सर्वाधिक संख्या ही हिंदू मतदारांची आहे. त्यामुळे या पट्ट्यात काँगे्रस, राष्ट्रवादी, एमआयएमसारख्या पक्षाला उमेदवार मिळणे अवघड झाले आहे. शहरातील सर्व 115 वॉर्डात उमेदवार देणे कोणत्याही पक्षाला शक्य नाही.